वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीवर टीका करणारे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना प्रत्युत्तर दिले. बाळासाहेब थोरात यांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा स्वत:च्या पक्षात काय चालले आहे, याकडे लक्ष द्यावे. भाजपचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुजय विखे पाटील हे 28 मे 2023 रोजी रात्री साडेअकरा वाजता तुघलक लेनमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना भेटून आले.
ही घटना बाळासाहेब थोरात यांच्यासाठी चांगली आहे, असे मी मानत नाही. दुसरी बाळासाहेबांसाठी धोक्याची घंटा असणारी घटना म्हणजे ९ जून 2023 रोजी दुपारी तीन वाजता खरगे हे सोलापूरहून बंगलोरला गेले. तत्पूर्वी 8 जून 2023 रोजी राधाकृष्ण विखे-पाटील खरगेंना गुप्तपणे भेटले होते. त्यांच्यात काय चर्चा झाली, हे मी सांगत नाही.
पण भाजपची माणसं काँग्रेसला जाऊन भेटत आहेत आणि काँग्रेसवाले गाफील राहिले आहेत. मी बाळासाहेब थोरातांना सांगू इच्छितो की, ही परिस्थिती चांगली नाही. आमच्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही स्वत:चा पक्ष वाचवावा. अन्यथा तुमच्या हातातील काँग्रेस पक्ष कधी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हातात जाईल, ते सांगता येत नाही, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी थोरातांना लगावला.
