मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक (Maharashtra Assembly Election) पुढील वर्षी होणार आहे. तसेच लोकसभेची देखील सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. पण तत्पूर्वी याबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका (Loksabha Election) एकत्रित घ्याव्यात, असा प्रस्ताव प्रदेश भाजपने (BJP) केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वतीने ही मागणी केली जात आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका या लोकसभा निवडणुकीसोबतच घ्याव्यात, अशी त्यांची मागणी आहे. शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यामुळे या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे गटाचे तगडे आव्हान असेल, असे म्हटले जात आहे. महाविकास आघाडीही आक्रमकपणे निवडणुकांना सामोरे जात आहे. आघाडीतील पक्षांची युती घट्ट दिसत आहे. अशा स्थितीत विधानसभेच्या निवडणुका या लोकसभा निवडणुकीसोबत घेणे, भाजपसाठी फायदेशीर ठरणार आहे.
भाजप नेतृत्त्वाकडून प्रयत्न सुरु
महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक ही पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसोबतच घेण्याचा विचार भाजपच्या नेतृत्वाकडून सुरू आहे. राज्यातील विधानसभेची निवडणूक लोकसभेसोबतच घ्यावी, असा प्रस्ताव प्रदेश भाजपने केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवल्याचे सांगितले जात आहे.
स्थानिक निवडणुकाही होणार?
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात अद्याप या निवडणुकांबाबतची सुनावणी सुरू झालेली नाही. न्यायालयाने सुनावणीसाठी आता 28 मार्च ही तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे विधानसभा, लोकसभा निवडणुका एकत्रित झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुकाही तेव्हाच होतील, असे म्हटले जात आहे.
