नगर जिल्ह्यातील भेंडा बुद्रुक येथे विजेचा धक्का लागल्याने 9 म्हशींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे शेतक-यांचे अंदाजे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे फुलारी वस्ती परिसरात ज्ञानदेव शिरसाठ आणि शिवाजी शिरसाठ यांच्या राहत्या घराजवळ म्हशींचा गोठा आहे. या गोठ्यात त्यांच्या 12 म्हशी बांधलेल्या होत्या.
रात्री साडे आठच्या सुमारास म्हशींना चारा टाकण्यासाठी बांधलेल्या गव्हाणीच्या लोखंडी एंगलमध्ये वीज प्रवाह उतरल्याने म्हशींचा मृत्यू झाल्याचे समाेर आले. यामध्ये ज्ञानदेव यांच्या 5 तर शिवाजी यांच्या 4 अशा एकूण 9 म्हशींचा विजेच्या धक्याने दुर्दैवी मृत्यु झाला.
या घटनेत शेतकऱ्यांचे सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेत 3 म्हशी बचावल्या आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 9 पैकी 7 म्हशी गाभणी तर 2 म्हशी दूभत्या होत्या. या घटनेचा महसूल तसेच पोलिस दलाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.
