मोठी बातमी! रोहित्र चोरणारी टोळी अखेर गजाआड, साकूर, पारनेर, शिरूरमधील आरोपी जेरबंद…..

शिरूर – स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या पथकाने विद्युत रोहित्र चोरी करणारी टोळी जेरबंद करून ४८ गुन्हे उघडकीस आणले. ५०० किलो ग्रॅम तांब्याच्या पट्टया व तारांसह गुन्हयात वापरलेली वाहने जप्त करीत १४ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

विशाल पवार (वय २५, तांबेवाडी, वडगाव सावताळ, ता .पारनेर), प्रदीप शिंदे (वय २६ रा. साकूर गाडेकर, अहमदनगर), ओमकार घोडेकर (वय ११, रा साकुर घोडेकर मळा, जि. नगर), आदेश भुजबळ (वय १९, रा. साकुर हळदावस्ती, जि. नगर),हर्षल शिंदे (वय २४, रा. साकूर गाडेकरमळा, ता. संगमनेर), श्रीकांत जाधव (वय २२, रा. सातकरवाडी दहीवडी, ता. शिरुर), करण माळी (वय १९, रा. दहिवडी मांजरेवस्ती, मूळ रा. वांगदरी), सोनू धुळे (वय २८, रा. आंबळे, मूळ गाव वाडेबोल्हाई थेऊर), असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन तपास पथकांनी शिरूर पोलिसांच्या मदतीने घटनास्थळ, सीसीटीव्ही फुटेज तपासले.

हे गुन्हे रेकॉर्डवरील आरोपींनी केल्याची माहिती मिळाली. रोहित्र चोरणारी टोळी ही तळेगाव ढमढेरेत असल्याची माहिती मिळाल्याने पथकांनी सापळा रचून टोळीला अटक केली.

त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी हा मुद्देमाल आरोपी दीपक सांगळे (रा. बोलेगाव फाटा नागापूर, जि. अहिल्यानगर) यास विक्री केल्याचे सांगितले. त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपींनी वापरलेली चारचाकी तसेच दुचाकी वाहने जप्त केली. आरोपी विशाल याच्यावर एकूण ११ गुन्हे दाखल असून आरोपी प्रदीप शिंदे याच्यावर ३ गुन्हे दाखल असून तो ओतूरच्या चोरीच्या गुन्ह्यात फरार आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवडे,सहायक पोलीस निरीक्षक राहूल गावडे, योगेश लंगुटे, अभिनीत साकंद, एकनाथ पाटील अंमलदार तुषार पंदारे, दीपक साबळे, जनार्दन शेळके, राजू मोमीण, अतुल डेरे आदींनी केली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.

Leave a Comment