संगमनेर : नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत कृषी साहित्याची दोन दूकान फोडून पाणबुडी मोटार, बोअर मोटार, मल्चिंग पेपर इत्यादी शेती उपयोगी साहीत्याची जबरी चोरी करणाऱ्या नगर जिल्ह्यातील संगमनेर व पारनेर तालुक्यातील पाच जणांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठं यश मिळाले. तसेच आरोपींकडून ११.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, मागील महिन्यात शेती साहित्याचे दुकानांमध्ये चोरी झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी स्वतः लक्ष देवून सदरचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत जुन्नर विभागात काम करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथकाचे सपोनि महादेव शेलार, पोहवा दिपक साबळे, पोना संदिप वारे, पोकॉ अक्षय नवले, दगडू वीरकर यांना योग्य मार्गदर्शन तसेच तांत्रिक तपास तंत्राबाबत योग्य सुचना करून कारवाईचे आदेश दिले.
सदर गुन्हयाचे अनुशंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या जुन्नर विभागाचे तपास पथकाने गुन्हयांचा समांतर तपास चालु केला. गोपनीय बातमीदार यांना योग्य माहिती देवून माहिती काढणेबाबत सुचीत केले असता, नारायणगाव पोस्टे गु.र.नं. 63/2023 भादंवि 461,380 हा गुन्हा पोखरी पारनेर परीसरातील इसमांनी केला असून त्यांचेकडे बोलेरो वाहन तसेच पिकअप वाहन असल्याचे सांगितले आणि त्यांनी गुन्हे करते वेळी सदरची वाहने वापरली आहेत. मिळाले बातमीचे आधारे पाच इसमांना त्यांचेकडील पिकअप गाडी नंबर एम.एच. 12 एफ.डी. 9849 व बोलेरो नं एम.एच. 14 डी.ए. 2065 या वाहनांसह ताब्यात घेवून त्यांचेकडून नारायणगाव पोलीस स्टेशन येथे 1) गु.र.नं. 53/2023 भादंवि 461,380 2) गु.र.नं. 63/2023 भादंवि 461,380 प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून गुन्हयात चोरी गेलेला मल्चिंग पेपर, बोअर मोटार, पाणबुडी मोटार, शेती पंप असा मुद्देमाल तसेच चोरी करण्यासाठी वापरलेली पिकअप गाडी व बोलेरो गाडी असा एकूण साडे अकरा लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुभाष भोराजी दुधवडे, (वय 27 वर्षे), गजानन धावजी दुधवडे, (वय 47 वर्षे) दोघे रा. पारदरा, वारणवाडी, पोखरी ता पारनेर जि अहमदनगर, अजय रंगनाथ वाघ वय 26 वर्षे, रा. गुरेवाडी, म्हसोबा झाप ता. पारनेर जि अहमदनगर, सोन्याबापू गेणभाऊ मधे, वय 23 वर्षे, भाऊसाहेब रावसाहेब दुधवडे वय 28 वर्षे रा खंदरमाळ, माळवदवाडी ता संगमनेर जि अहमदनगर या आरोपींना अटक करून नारायणगाव पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक मितेष घट्टे पुणे विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सपोनि महादेव शेलार, सफौ. तुषार पंदारे, पोहवा दिपक साबळे, विक्रम तापकीर, मंगेश थिगळे, राजू मोमीण, जनार्दन शेळके, पोना संदिप वारे, पोकॉ अक्षय नवले, चापोकॉ दगडु विरकर, चापोकॉ अक्षय सुपे यांनी केली आहे.
