अबब! साखरपुडा झाला, घरात लग्नाची लगबग, नवरदेव रात्री झोपला सकाळी उठलाच नाही… 

नागपूरच्या वाठोडा परिसरातील चक्रधरनगर एक मन पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. ज्या घरात दोन आठवड्यांपूर्वी साखरपुड्याचा आनंद होता आणि जिथे लग्नाची लगबग सुरू होणार होती, त्याच घरात आता स्मशानशांतता पसरली आहे. याचं कारण म्हणजे साखरपुडा झाल्यानंतर अवघ्या दोनच आठवड्यात नवरदेवाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री झोपेतच त्याच्यावर काळाने झडप घातली आहे.

साखरपुडा झाला, पण लग्न अपूर्णच राहिलं…

रोहित धनंजय दलाल असं या २९ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो मूळचा नागपूरचा रहिवासी असून सध्या दिल्लीत वास्तव्याला होता. त्याने प्रतिष्ठित ‘एलआयटी’मधून आपले शिक्षण पूर्ण केलं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो नोकरीनिमित्त दिल्लीत स्थायिक झाला होता. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्याने वाठोडा येथील ई-नारायणा स्कूलजवळ स्वतःचा फ्लॅटही खरेदी केला होता. अवघ्या १५ दिवसांपूर्वीच रोहितचा विवाह निश्चित होऊन साक्षगंधाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला होता. सर्व काही सुरळीत सुरू असताना काळाने अचानक झडप घातली.

रात्रीत सगळं संपलं सकाळी फोनही उचलला नाही

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री रोहित नेहमीप्रमाणे जेवण करून झोपला होता. गुरुवारी सकाळी नागपूरहून त्याच्या आईने त्याला वारंवार फोन केले, मात्र रोहितकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बराच वेळ झाला तरी फोन उचलला जात नसल्याने आई चिंतेत पडली. त्यांनी तत्काळ दिल्लीतील रोहितच्या मित्रांशी संपर्क साधून घरी जाण्यास सांगितलं. मित्र जेव्हा त्याच्या घरी पोहोचले, तेव्हा रोहित अंथरुणावर बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

झोपेतच आला हृदयविकाराचा झटका

वैद्यकीय अहवालानुसार, रोहितचा मृत्यू झोपेत असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला. अवघ्या २९ व्या वर्षी एका होतकरू तरुणाचा असा अचानक अंत झाल्याने दलाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रोहितचे पार्थिव नागपुरात आणल्यानंतर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रोहितच्या पश्चात आई अर्चना, वडील धनंजय (राजू) दलाल, लहान भाऊ सुमित आणि मोठा आप्तपरिवार आहे. अवघ्या काही दिवसांवर लग्न येऊन ठेपलं असताना तरुणाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment