मद्यविक्रीचा परवाना देणे भोवले, ग्रामसेवक निलंबित तर सरपंच….

नाशिक : ग्रामसभेचा ठराव नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे गावात बिअर बार व मद्यविक्रीचा परवाना देणे चांदवड तालुक्यातील पिंपळदच्या ग्रामसेवकाला चांगलेच भोवले आहे. ग्रामसेवक देवीदास आनंदा पाटील यांना ग्रामपंचायत विभागाने निलंबित केले आहे.

तसेच सरपंचांवरही अपात्रतेचा ठपका ठेवत त्याबाबतच्या कारवाईचा अहवाल विभागीय महसूल आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. त्यावर या आठवड्यात निर्णय होणे अपेक्षित आहे.

पिंपळद येथे कार्यरत ग्रामसेवक पाटील आणि सरपंच यांनी संगनमताने ग्रामसभेचा ठराव न घेता, गावात बिअर बार, मद्यविक्री परवाना दिल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने चांदवड गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करून दि. १५ फेब्रुवारीला अहवाल सादर केला होता. या अहवालाच्या आधारे विभागीय आयुक्तांकडून परवानगी मिळाल्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सुनावणी झाली. यात, ग्रामसभेत प्रत्यक्षात मद्य परवान्याचा कोणताही ठराव पारित केलेला नसताना, ग्रामसेवक व सरपंच यांनी तसा परवाना दिल्याचे निष्पन्न झाले. बिअर बार आणि मद्यविक्रीचा परवाना देण्याचा ग्रामसभेतील ठराव हा बनावट असल्याचे आणि प्रत्यक्ष ग्रामसभेत त्याबाबतचा विषयच झाला नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यावर प्रशासनाने ग्रामसेवक पाटील यांनी केवळ कागदोपत्रीच हा निर्णय घेतल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Comment