माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे पिता पुत्र, अजित पवार यांच्यासह इतरांवर खोटे आरोप करण्यासाठी फडणवीसांनी दबाव टाकला असा आरोप अनिल देशमुखांनी केला. मिरजचे समित कदम या व्यक्तीला ५-६ वेळा पाठवलं. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवारांवर मी खोटे आरोप करायचे. त्या खोट्या आरोपाचे प्रतिज्ञापत्र द्यायचं असं मला सांगितले, असा आरोप करत अनिल देशमुखांनी समित कदम यांच्याबरोबरचे फडणवीसांचे फोटो पत्रकार परिषदेत दाखवले.
“तीन वर्षांपूर्वी फडणवीस यांनी समित कदम यांना माझ्याकडे पाठवलं होतं. समित कदम माझ्याकडे एफिडेव्हिट घेऊन आले होते. समित कदम आणि फडणवीस यांचे जवळचे संबंध आहेत. समित कदम हे नगरसेवकही नाही तरीही फडणवीसांनी त्यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली. राजकीय नेत्यांच्या मुलाला अडकवण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न होता. ठाकरे पिता पुत्र, अजित पवार यांच्यासह इतरांवर खोटे आरोप करण्यासाठी फडणवीसांनी दबाव टाकला,” असा आरोप देशमुख यांनी केला. “माझ्यावर खोटे आरोप करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. केवळ उद्धव ठाकरे, अजित पवार नाहीत तर त्यांची मुले आदित्य ठाकरे, पार्थ पवार यांच्यावरही आरोप करायला सांगितले. राजकीय नेत्यांच्या मुलांना खोट्या आरोपात अडकवता येईल याप्रकारचा प्रयत्न ३ वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केला. फडणवीस यांचा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि पार्थ पवार यांना अडकवण्याचा डाव होता. जर मी त्या एफिडेविटवर सही केली असती तर आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जेलमध्ये असते,” असं देशमुख म्हणाले.
