अबब! बसची स्कुटीला धडक, दुचाकीच स्टँड घुसल गळ्यात 

पुण्यात बसने स्कुटीला धडक दिल्यानं विचित्र असा अपघात झाला. या अपघातानंतर १९ वर्षांच्या तरुणाच्या गळ्यात स्कुटरचं स्टँड घुसलं. यामुळे तरुण गंभीर जखमी झाला. गळ्यात स्टँड घुसलेल्या अवस्थेतच त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. पौंड रोडवर हा अपघात झाला. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मोटर मेकॅनिकच्या मदतीने लोखंडी स्टँड गाडीपासून वेगळं करण्यात आलं. त्यानंतर तरुणावर रुग्णालयात चार तासांची शस्त्रक्रिया करून लोखंडी स्टँड काढण्यात आलं. मंगळवारी हा अपघात झाला, आता तरुण रुग्णालयात असून त्याची प्रकृती स्थिर आहे. अपघात झाल्यानंतर तरुण टेम्पोखाली होता तर स्कुटी त्याच्या समोरच पडली होती. त्याला बोलता येत नव्हतं आणि तिथून उठण्यासारखी त्याची स्थितीही नव्हती. घटनास्थळीच मेकॅनिकला बोलावण्यात आलं. स्कुटीच्या स्टँडचा रॉड गळ्यात घुसल्यानं तरुणाला गंभीर जखम झाली. रक्तस्रावही मोठ्या प्रमाणावर झाला. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मेकॅनिकने स्कुटीचं स्टँड काढलं तोपर्यंत एक रुग्णवाहिका दाखल झाली. त्याला गळ्यात अडकलेल्या स्टँडसह डेक्कन जिमखाना इथल्या रुग्णालयात नेलं. तरुणाच्या गळ्यातून रक्तस्राव होत होता. तो शुद्धीत होता, पण बोलणं शक्य नव्हतं.

तरुणावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, इमर्जन्सी वॉर्मडमध्ये आणलं तेव्हा तरुण शुद्धीवर होता. त्याच्या गळ्यात स्टँड अडकलं होतं. तो हातपाय हलवू शकत होता. पण मानेला गंभीर दुखापत झाली होती. दुचाकीचा रॉड जवळपास सहा इंच गळ्यात घुसला होता.. तोंडातील रक्तवाहिनीला गंभीर इजा झाली होती. खोकल्यामुळे रक्त येत होतं. हे रक्त फुफ्फुसात जाऊ नये यासाठी ताठ बसवलं होतं. अन्यथा त्याची प्रकृती आणखी बिघडली असती. प्रचंड वेदना होत असतानाही तरुणाने रॉड काढेपर्यंत उपचाराला सहकार्य केलं. त्याचा रक्तदाब आणि ऑक्सिजनची पातळीही स्थिर होती. सुदैवाने यामध्ये त्याच्या मणक्याला दुखापत झाली नाही. रॉडमुळे अन्ननलिका, स्वरयंत्र आणि जीभेतील रक्तवाहिनीला गंभीर इजा झाल्याचं एक्स रेमध्ये दिसून आल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं. चार तासांच्या शस्त्रक्रियेनंतर रॉड काढण्यात यश आलं. शस्त्रक्रियेनंतर तरुणाला चार दिवस आयसीयूमध्ये ठेवलं होतं. त्याला नळीद्वारे अन्न आणि ऑक्सिजन दिला जात आहे. त्याचे रिपोर्ट पाहून आणि जखमा बऱ्या झाल्यानंतर नळ्या काढण्यात येतील. किमान १५ ते २० दिवसात तो बरा होईल अशी अपेक्षा डॉक्टरांनी व्यक्त केलीय.

Leave a Comment