बंगळुरू : लग्नानंतरचा पहिला दिवस नवरी आणि नवरदेव दोघांसाठीही अतिशय खास असतो. कारण, या दिवसापासून ते एका नव्या आयुष्याला सुरुवात करत असतात. मात्र, आता एक अतिशय धक्कादायक आणि अजब प्रकरण समोर आलं आहे. कर्नाटकातील कोलारमध्ये एका नवरदेवाने लग्न करून आपल्या वधूला घरी आणलं. सगळे विधी झाल्यानंतर त्यांची एकमेकांसोबतची पहिली रात्र होती. मात्र, वधू-वर बेडरूममध्ये जाताच एकमेकांसोबत भिडले.
या दोघांनी एकमेकांना इतकी मारहाण केली की दोघेही गंभीर जखमी झाले. कुटुंबीयांनी घाईघाईने दोघांनाही रुग्णालयात नेलं. मात्र, उपचारादरम्यान वधूचा मृत्यू झाला. तर, नवरदेवावर उपचार सुरू आहेत. ही घटना केजीएफ तालुरा येथील चंबरासनहल्ली भागात घडली. नवीन आणि लिकिताचा विवाह 7 ऑगस्ट रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला. नवीनने लिकिताशी लग्न करून तिला आपल्या घरी आणलं. वधू लिकिता हिचं सासरच्या घरी स्वागत करण्यात आलं. मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी आणि नवरदेव रूममध्ये जाताच त्यांच्या खोलीतून ओरडण्याचे आवाज येऊ लागले.
हे ऐकून कुटुंबीयही घाबरले. ते दार ठोठावू लागले. पण वर किंवा वधू दोघांनीही दार उघडलं नाही. काही वेळाने त्यांनी दरवाजा उघडला असता आतील दृश्य पाहून कुटुंबीय थक्क झाले. हे जोडपं रक्ताच्या थारोळ्यात पडलं होतं. वस्तू इकडे तिकडे विखुरल्या होत्या. तत्काळ दोघांनाही उपचारासाठी केजीएफ रुग्णालयात नेण्यात आलं. येथे नववधू लिकिता हिचा मृत्यू झाला. नवरदेवाची प्रकृती अजूनही गंभीर आहे.
ही भांडणं का झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, नवीन हा दारूच्या नशेत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण झालं असावं. नवीन शुद्धीवर येईपर्यंत भांडणाचं खरं कारण कळू शकणार नाही. घरातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, लिकिता आणि नवीनचा हा प्रेमविवाह होता. दोघांचं आधीपासून अफेअर होतं. त्यांनी कुटुंबीयांची समजूत घातल्यानंतर हे नातं पक्कं झालं होतं. त्यानंतर 7 ऑगस्ट रोजी विवाह झाला. मात्र लग्नानंतर काही तासांतच वधूचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
