मोठी बातमी! LPG सिलेंडरवर मिळणार ‘एवढी’ सबसिडी

वाढत्या महागाई वरून केंद्र सरकारवर मोठी टीका होत होती. महागाई मुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान, वाढत्या महागाई पासून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.

उज्ज्वला योजने(Ujjwala Yojana) अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्याना सबसिडी(Subsidy) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेच्या ९.६ कोटी लाभार्थ्यांसाठी अनुदानाचा कालावधी आणखी एक वर्षाने वाढवण्यात आला आहे.

याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, २०२२ मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एका वर्षात १२ सिलिंडर आणि एका सिलिंडरवर २०० रुपये सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय किमतीत कोणताही मोठा बदल नसल्यामुळे ही सबसिडी आणखी एक वर्ष वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी एकूण ६,१०० कोटी रुपये आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ७,६८० कोटी रुपये खर्च होणार आहे. हा बोजा केंद्र सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर हे अनुदान मंजूर करण्यात आले आहे

या महिन्यात केंद्र सरकारने विनाअनुदानित १४.२ किलोच्या सिलिंडरमध्ये ५० रुपयांची वाढ केली होती, त्यानंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये एलपीजीची किंमत प्रति युनिट १,१०३ रुपये झाली आहे. त्याचवेळी, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत ३५०.५० रुपयांनी वाढून प्रति सिलेंडर २,११९.५० रुपये झाली आहे.

Leave a Comment