अब्दुल सत्तार म्हणाले, संगमनेरच्या घोड्याची लगाम विखे पाटलांच्या हातात

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्तांना लवकरच मदत दिली जाणार असल्याचं वक्तव्य कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांनी केलं.

शिर्डीत तीन दिवस महापशुधन एक्सपोचे (Mahapasudhan Expo) आयोजन करण्यात आलं आहे. या एक्सपोचं उद्घाटन कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. माझ्या जडणघडणीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok chavan) आणि राधाकृष्ण विखे पाटलांचा मोठा वाटा असल्याचे सत्तार म्हणाले.

देशपातळीवरील सर्वात मोठ्या महापशुधन एक्स्पोचं आयोजन शिर्डीत करण्यात आलं आहे. शेतीला पूरक व्यवसाय असणाऱ्या पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन तसेच इतर सर्व पशुपक्षांचा महाएक्स्पो शिर्डीत सुरु झाला आहे. 46 एकर जागेवर हे एक्स्पो होत आहे. या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन चर्चासत्र आणी सांस्कृतिक कार्यक्रम याठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत.

महापशुधन एक्स्पो मध्ये 300 स्टॉल लावण्यात आले आलेत. तसेच या प्रदर्शनात विविध प्रकारच्या गायी आणि घोडेही आहेत. यामध्ये संगमनेरी घोडेही आहेत हे मला पहिल्यांदाच माहित पडल्याचे सत्तार म्हणाले.

घोडा कुठलाही असो पण लगाम विखे पाटलांकडे असतो. संगमनेरच्या घोड्याचीही लगाम विखे पाटलांच्या हातात असल्याचा टोला सत्तार यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांना लगावला. ज्यांना लगाम धरता येते त्यांनीच घोडा खरेदी करावा. आपल्याला लगाम धरता येतच नाही. ती लगाम धरण्याचं काम विखे पाटील चांगल्या पद्धतीने करतात असेही सत्तार म्हणाले.

Leave a Comment