पुणे : शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली असून मंगलदास बांदल यांना अटक केली आहे. काल रात्री उशिरा मंगलदास बांदल यांना अटक करून मुंबईला नेण्यात आलं.
आज दुपारी मंगलदास बांदल यांना न्यायालयात हजर केले जाईल. ईडीने रात्री साडे अकरा वाजता अटक केल्याची माहिती समोर येतेय. ईडीच्या कारवाईमुळे मंगलदास बांदल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
ईडीने मंगळवारी बांदल यांच्या शिरूर आणि पुण्यातल्या निवासस्थानी छापे टाकले होते. त्यांची १६ तास चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा अटकेची कारवाई करण्यात आली. शिरूर इथं शिक्रापूर आणि पुण्यात महमंदवाडी इथं निवासस्थानी ईडीने छापे टाकले. यात बांदल यांच्या पत्नी, भाऊ आणि कुटुंबातील इतर सदस्यांची ईडीने चौकशी केली. महंमदवाडी इथल्या बंगल्यात मंगलदास बांदल यांचीही ईडीने चौकशी केली होती.
पैलवान म्हणून परिचित असलेले मंगलदास बांदल हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत. त्यांना २०२० मध्ये ५० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणानंतर निलंबित करण्यात आलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आक्रमक भाषणातुन बांदल चर्चेत राहिले होते. बांदल यांच्या दोन्ही निवासस्थानी ५ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. याशिवाय पाच आलिशान गाड्या आणि एक कोटी किमतीची चार मनगटी घड्याळे ही आढळून आली आहेत.
