आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी बैठकीचा सपाटा लावला आहे.
महाविकास आघाडीच्या पहिल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आधीच जाहीर करण्याच्या सूचना नेत्यांना दिल्या. त्यानंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा कोण असणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याहबाबत महत्वाचं भाष्य केलं आहे.
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य करताना बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं की, ‘मुख्यमंत्रिपदाचा विषय फार महत्वाचा नाही. मुख्यमंत्री कोण होणार, हे आम्ही एकत्र बसून ठरवू. महायुतीचे सरकार घालवणे हा प्राधान्यक्रम आहे. राज्याला चांगलं सरकार देणं ही आमची जबाबदारी आहे’.
मुख्यमंत्रिपदाच्या नावांच्या चर्चांवर भाष्य करताना थोरात म्हणाले, ‘कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून आमची नावं घेतली जातात. त्याला आम्ही फार महत्त्व देत नाही. आमच्यासाठी महायुती सरकार घालवणे महत्त्वाचे आहे’.
