साकूर वार्ताहर (DSNews24/किरण पुरी) संगमनेर तालुक्यातील मुळा नदी किनारी वसलेल्या मांडवे बुद्रुक येथे गेल्या अनेक वर्षांपासून परंपरेनुसार आराध्य दैवत हजरत चाॅंदशहावली बाबांच्या तीन दिवसीय यात्रोत्सवास सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने यात्रा कमिटीच्या वतीने यात्रोत्सवाचे सुसज्ज नियोजन केले आहे. यात्राकाळात लाखो भाविक हजरत चाॅंदशहावली बाबांच्या चरणी नतमस्तक होत असतात.
यात्रेचा प्रारंभी सोमवारी रात्री गावठाणापासून ते चाॅंदशहावली बाबांच्या मंदिरापर्यंत ढोल ताशांच्या गजरात संदल काढण्यात आला. तसेच यावेळी दर्गेवर फुलांची चादर चढविण्यात आली. तसेच मंदिरासमोर शोभेच्या दारुची आतषबाजी करण्यात आली. नेत्रदीपक आतषबाजीने परिसर आसमंत उजळून निघाला. उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. तसेच ढोल ताशांच्या गजरात ग्रामस्थांनी लेझीम खेळत आनंद व्यक्त केला. यावेळी महिला, युवक, युवती, पुरुष, ज्येष्ठ आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार दि. २८ मार्च रोजी रात्री आनंद लोकनाट्य जळगावकर यांचा तमाशा होणार आहे. तसेच बुधवार दि. २९ मार्च रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी सकाळपासूनच लाखो भाविक हजेरी लावतात. तसेच दुपारी २ वाजेपासून जंगी निकाली कुस्त्यांचा हगामा आयोजित केला असून विविध जिल्ह्यांतील नामांकित पैलवान आखाड्यात उतरणार आहे.
दरम्यान, यात्रोत्सवानिमीत्त मांडवे बुद्रुक गावात विविध खेळणी, पदार्थ, पाळणे, मिठाई आदि दूकाने थाटली आहेत. त्यामुळे परिसर गजबजून गेला आहे.
