मोठी बातमी! पुजा खेडकर यांच्या वडीलांचे मंत्री विखे पाटलांवर खळबळजनक आरोप

बडतर्फ प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. दिलीप खेडकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली.

यावेळी त्यांनी आपल्या मुलीवर झालेले आरोप खोटे असल्याचं स्पष्ट केलं. आपल्याविरोधात एफआयआर दाखल असल्याने दबाव होता. त्यामुळे आपण इतके दिवस समोर येऊ शकलो नाही, असा खळबळजनक आरोप दिलीप खेडकर यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची चिन्हं आहेत. “माझी मुलगी डॉ. पूजा खेडकर हिच्या बाबतीत जी माहिती दिली गेली ती वस्तुस्थितीला धरून नाही. तिच्या बाबतीत एक फ्रॉड मुलगी म्हणून सिलेक्शन झाल्याची माहिती गेली ती चुकीची आहे. तिचे आयुष्य उद्ध्वस्थ झाले आहे. माझ्या विरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला होता म्हणून मला समोर येता आले नाही”, असं दिलीप खेडकर म्हणाले.

दिलीप खेडकर यांचा विखे पाटील यांच्यावर आरोप

“माझ्या मुलीला जो त्रास झाला तो माझ्यामुळे झाला. मी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्यामुळे माझ्या मुलीची बदनामी झाली. प्रस्थापितांना वाटत होतं उभं राहू नये. या नेत्यांनी जाणूनबुजून त्रास दिला. विखे पाटील यांच्या मनामध्ये राग होता. त्यांच्याकडे महसूल खाते होते. त्याचा शासकीय अधिकाऱ्यांवर प्रभाव पडला आहे. पण नैसर्गिक न्याय आम्हाला मिळायला पाहीजे होता. तो मिळाला नाही”, असा आरोप दिलीप खेडकर यांनी केला.

Leave a Comment