लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा (Sharad Pawar NCP) आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. आगामी विधानसभेसाठी शरद पवारांनी विशेष लक्ष दिल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान जुन्नरमध्ये आमदार अतुल बेनकेंना (Atul Benke) घेरण्यासाठी शरद पवार नव्या शिलेदाराला मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जुन्नर विधानसभा मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले (Mohit Dhamale) यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मोहित ढमाले जुन्नर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. मोहित ढमाले यांनी २०१७ ते २०२२ या काळात जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांना जुन्नर तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळवून देण्यात ढमाले यांची भूमिका महत्त्वाची ठरली असल्याचे बोलले जाते.
मोहित ढमाले यांनी पक्षाकडे विधानसभेच्या उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे विधानसभा उमेदवारीच्या रुपाने शरद पवार मोहित ढमाले यांना निष्ठेचे फळ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
