राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. या घटनेने राजकारण सुद्धा तापले आहे. Y दर्जाची सुरक्षा असतानाही त्यांच्यावर तीन जणांंनी हा हल्ला केला. अशात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
बाबा सिद्दीकी हे त्यांचा मुलगा झिशान याच्या कार्यालय परिसरात असताना, 3 जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यातली 1 गोळी बाबा सिद्दीकी यांच्या छातीत लागली होती. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे.
बाळासाहेब थोरात काय म्हणाले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे. काँग्रेस पक्षात आणि राज्याच्या मंत्रीमंडळात आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केले होते. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही सर्व सिद्दिकी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत.
मुंबईसारख्या शहरामध्ये वाय दर्जाची सुरक्षा असणा-या सत्ताधारी पक्षाच्या नेत्याची हत्या होते यावरून राज्यात कायदा सुव्यवस्था नावाची काही गोष्ट शिल्लक आहे का ? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर आणि बाबा सिद्दिकी यांच्या हत्यांच्या घटनेमुळे मुंबई आता सुरक्षित शहर राहिलेले नाही; पोलीस आणि गृहविभाग कायदा सुव्यवस्था राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, हे स्पष्ट झाले आहे. असे ट्विट बाळासाहेब थोरात यांनी केले आहे
