माजी मंत्री बाबा सिद्धिकी यांच्या हत्येनंतर शरद पवार संतापले

मुंबई : राज्याचे बडे नेते, माजी मंत्री बाबा सिद्धिकी यांची मुंबईत दसरा सणादिवशी अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. सिद्धिकी यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून राज्यातली कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही राज्य सरकारला घेरले आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते, अशा शब्दात शरद पवार यांनी जनतेला धोक्याची जाणीव करून दिली आहे.

मुंबईतील वांद्रे पूर्व येथे त्यांच्यावर जवळपास चार राऊंड फायर करण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सिद्धिकी यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या छातीत आणि पोटात दोन ते तीन गोळ्या लागल्याचे सांगण्यात येते. रुग्णालयात नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींपैकी दोन आरोपींना पोलिसांनी पकडल्याचे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना सांगितले.

…तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते!

राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो.

Leave a Comment