बिग ब्रेकिंग! शरद पवार गटात आणखी एका दिग्गज नेत्याचा जाहीर प्रवेश 

भंडारा – तुमसरचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबई येथे शरद पवारांचे उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. त्यामुळे आता वाघमारे हे तुमसर विधानसभा मतदारसंघातून तूतारी हातात घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.

भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार असलेल्या चरण वाघमारे यांनी यापूर्वी बीआरएस पक्षात प्रवेश केला होता. मात्र आंध्र प्रदेशात सत्ता बदल झाल्यानंतर बीआरएस चे भवितव्य धोक्यात आले. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि लोकसभा निवडणूक माजी आमदार चरण वाघमारे यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला होता. लोकसभा निवडणुकीच्या वेळी चरण वाघमारे हे काँग्रेसचे उमेदवार असतील अशी जोरदार चर्चा होती. मात्र काँग्रेस मधील काही लोकांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला होता.

दरम्यान येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाघमारे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष होते. ते अपक्ष निवडणूक लढतील असे वाटत असताना दुसरीकडे शरद पवार यांच्या संपर्कातही ते होते. अखेर आज मुंबई येथे त्यांनी शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला.

यावेळी वाघमारे यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. वाघमारे यांच्या या प्रवेशामुळे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत तुमसर मतदारसंघातून चरण वाघमारे हे हातात तुतारी घेऊन रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. असे झाल्यास दोन राष्ट्रवादींमध्ये या ठिकाणी काट्याची लढत होणार हे स्पष्ट आहे.

Leave a Comment