शिर्डीत राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात प्रभावती घोगरे मैदानात?…..

भारतीय जनता पक्षाने विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भाजपच्या पहिल्याच यादीत शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील यांचे तिकीट फिक्स करण्यात आले आहे. त्यामुळे शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील हे पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला अभेद्य राखण्यासाठी विधानसभेच्या रिंगणात उतरतील. दुसरीकडे लोकसभेतील सुजय विखेंच्या पराभवानंतर आत्मविश्वास वाढलेली महाविकास आघाडी कोणता डाव टाकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

कसं असेल शिर्डी विधानसभेचे चित्र, जाणून घ्या… 

शिर्डी विधानसभा मतदार संघ हा विखे पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. शिर्डी विधानसभेवर अनेक वर्षांपासून विखे पाटील घराण्याचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यानंतरही विखे पाटील यांनी आपले वर्चस्व कायम राखले. दुसरीकडे या मतदार संघात काँग्रेस आणि शिवसेनेचीही ताकद वाढताना दिसत आहे. शिर्डीमध्ये विखे पाटील यांच्याविरोधात महाविकास आघाडी कोणाला मैदानात उतरवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

याठिकाणी सध्या मविआच्या उमेदवार म्हणून माजी आमदार चंद्रकात घोगरे यांच्या सुनबाई प्रभावती घोगरे यांच्या नावाची चर्चा आहे. प्रभावती घोगरे या विखे पाटलांच्या कट्टर विरोधक आहेत. तसेच त्यांचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे यांच्याशीही चांगले संबंध आहेत. त्यामुळे शिर्डीमधून त्या विखे पाटील यांच्याविरोधात मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

2014 मध्ये शिर्डी मतदार संघात काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली होती. तेव्हा काँग्रेस पक्षाचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील 1,21,459 मतं मिळवून विजयी झाले होते. तर शिवसेनेचे उमेदवार अभय शेळके यांचा 74,662 मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर विखे पाटील भाजपमध्ये गेल्याने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिर्डीत भाजप विरूद्ध काँग्रेस अशी लढत झाली होती. या निवडणुकीमध्ये भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील 1,31,316 मतांनी विजयी झाले होते. तर काँग्रेसचे सुरेश थोरात यांचा 87,024 मतांनी पराभव झाला होता.

Leave a Comment