संगमनेर – राजकीय पदाचा कोणताही बडेजाव न ठेवता सर्वसामान्य भाविकांमध्ये मिसळून संगमनेरचे आमदार अमोल खताळ व नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे सुरू असलेल्या योगीराज गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहात सहभाग घेतला. दोन्ही आमदारांनी महिला-पुरुष भाविकांसोबत पंक्तीत बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
धनगरवाडी येथील सप्ताहास आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख प्रभाकर शिंदे, बाळासाहेब पवार, राहुल गोंदकर, महेश महाले, संतोष जाधव, सरूनाथ उंबरकर, अभिजीत पुंड यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट देत संत गंगागिरी महाराजांचे दर्शन घेतले.
यावेळी आमदार खताळ, आमदार लंघे व खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह मान्यवरांनी रामगिरी महाराज यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. रामगिरी महाराज यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा योगीराज गंगागिरी महाराजांची शाल देऊन सन्मान करण्यात आला.
सप्ताहस्थळी आमदार खताळ व आमदार लंघे यांनी कोणतीही राजकीय औपचारिकता न ठेवता सर्वसामान्य भाविकांमध्ये सहजपणे मिसळून संवाद साधला. महिला व पुरुष भाविकांशी चर्चा करत त्यांनी त्यांच्या भावना आणि अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर दोन्ही आमदारांनी भाविकांसोबत पंक्तीत बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजात एकोपा, बंधुभाव आणि संस्कारांची भावना अधिक दृढ होते. अशा सप्ताहांच्या माध्यमातून समाजातील विविध घटक एकत्र येतात आणि परस्परांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होते, असे आमदार अमोल खताळ व आमदार विठ्ठलराव लंघे यांनी यावेळी सांगितले.
राजकीय पदे आणि जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही सर्वसामान्य नागरिक व भाविकांमध्ये सहजपणे मिसळून दोन्ही आमदारांनी सप्ताहात सहभाग घेतल्याने उपस्थित भाविकांनी समाधान व्यक्त केले.
