खवड्या डोंगर प्रकरणाला नव वळण! बहिणीच्या दाव्याने एकच खळबळ

खवड्या डोंगरावरून कोसळून चांदगुडे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालेल्या हृदयद्रावक घटनेमागे आता कौटुंबिक कलहाची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुरलीधर चांदगुडे यांच्या प्रेमविवाहाला कुटुंबीयांचा विरोध होता आणि त्यातून कुटुंबात दुरावा निर्माण झाल्याची माहिती नातेवाईकांकडून समोर आली आहे. मात्र, या घटनेमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

प्रेमविवाहामुळे कुटुंबात दुरावा?

मुरलीधर चांदगुडे यांनी सुमारे २० वर्षांपूर्वी संगीता यांच्याशी प्रेमविवाह केला होता. या विवाहाला त्यांच्या आई-वडिलांचा विरोध असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर मुरलीधर यांचं गावाकडे येणं-जाणं कमी झालं आणि कुटुंबीयांशी त्यांचा संपर्कही कमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुरलीधर यांच्या बहिणीनेही कुटुंबातील वादाबाबत गंभीर आरोप केले आहेत. तर मुरलीधर यांच्या वडिलांनीही मुलगा, पत्नी आणि मुलामध्ये कौटुंबिक वाद असल्याचा दावा केला आहे.

कुणाल डोंगराच्या कड्यावर उभा असताना त्याची आई संगीता त्याला खाली येण्यासाठी विनवणी करत होती. “तुझा वडिलांसोबत वाद असेल तर मी त्यांना सोडते, तुझ्यासोबत येते; पण मला सोडून जाऊ नकोस,” अशा आशयाची आर्त विनवणी त्यांनी केल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र कुणाल प्रचंड तणावात होता. त्याने आईला आपण जगण्याच्या मनःस्थितीत नसल्याचं सांगितल्याची माहिती आहे. आई आणि मुलामधील हा संवाद ऐकून घटनास्थळी उपस्थित असलेल्यांच्याही काळजात धस्स झालं.

कुणाल शुक्रवारी सकाळी सुमारे १० वाजता खवड्या डोंगरावर पोहोचला होता. तो कड्यावर उभा असल्याची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल, स्थानिक नागरिक आणि त्याचे आई-वडील घटनास्थळी पोहोचले.

सुमारे तीन तास कुणालची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याला खाली आणण्यासाठी बचाव पथकाने खबरदारीच्या उपाययोजनाही केल्या. मात्र, कुणाल वारंवार जागा बदलत होता.

अखेर कुणालने कड्यावरून खाली झोकून दिलं. त्याला वाचवण्यासाठी पुढे गेलेल्या वडिलांचा तोल गेला आणि तेही दरीत कोसळले. पती आणि मुलगा खाली पडल्याचं पाहून आई संगीता यांनीही त्यांच्या दिशेने धाव घेतली आणि त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत कुणाल, मुरलीधर आणि संगीता चांदगुडे या तिघांचा मृत्यू झाला.

नेमकं कारण अद्याप गुलदस्त्यात

या घटनेनंतर मोबाईल, आर्थिक अडचणी, वडील-मुलातील वाद आणि आता कौटुंबिक तसेच विवाहाशी संबंधित जुन्या वादांची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, कोणत्या कारणामुळे कुणालने टोकाचं पाऊल उचललं आणि त्यामागे नेमकी कोणती परिस्थिती होती, हे तपासातूनच स्पष्ट होणार आहे. एका कुटुंबातील तिघांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने खवड्या डोंगर परिसरासह संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Comment