मुंबई – केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जागतिक वडापाव दिनानिमित्त सोशल मीडियावर वडापावसोबत लसूण चटणी की तळलेली मिरची, असा मिश्कील सवाल करणारी पोस्ट केली. या पोस्टला उत्तर देताना आमदार सत्यजीत तांबे यांनी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणला.
‘लसूण चटणी किंवा तळलेली मिरची? दोन्हीपैकी काहीही चालेल. फक्त पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेत हा वडापाव खाण्याची संधी मिळाली पाहिजे. यासाठीच आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत,’ अशी मिश्कील प्रतिक्रिया तांबे यांनी दिली.
वडापावच्या निमित्ताने केलेल्या या प्रतिक्रियेतून तांबे यांनी पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठीची सर्वसामान्यांची भावना प्रभावीपणे मांडली. रेल्वेचा अभाव हा केवळ प्रवासाचा प्रश्न नसून शिक्षण, रोजगार आणि कुटुंबापासून दूर राहणाऱ्या तरुणांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेला प्रश्न असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
रेल्वे सेवा नसल्याने अनेक तरुणांना रोजगार किंवा शिक्षणासाठी घरापासून दूर राहावे लागते. पुणे-नाशिक थेट रेल्वे सेवा सुरू झाल्यास या तरुणांना वेळेत घरी पोहोचून आईच्या हातचे जेवण घेता येईल, अशी भावनिक बाजू तांबे यांनी या प्रतिक्रियेतून मांडली.
संगमनेरमार्गे रेल्वेसाठी सातत्याने पाठपुरावा
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेरमार्गे व्हावी, यासाठी गेल्या काही काळापासून विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजीत तांबे यांच्यासह नागरिक आणि विविध लोकप्रतिनिधींकडून या मागणीसाठी भूमिका मांडली जात आहे.
या मागणीसाठी ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी नाशिक, संगमनेर, जुन्नर आणि शिरूर येथे जनआंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी तसेच नागरिक सहभागी झाले होते.
विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग
पुणे-नाशिक थेट रेल्वे सेवा सुरू झाल्यास नाशिक, संगमनेर, जुन्नर, आंबेगाव, मंचर, खेड, चाकण आणि पुणे या भागांतील प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. शिक्षण, रोजगार, उद्योग, व्यापार आणि पर्यटनाच्या दृष्टीनेही हा रेल्वे मार्ग महत्त्वाचा ठरू शकतो. संगमनेरमार्गे या रेल्वे मार्गाचा विचार व्हावा, यासाठी केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.
रेल्वेमंत्र्यांच्या वडापाववरील पोस्टला उत्तर देताना आमदार तांबे यांनी कोणतीही थेट राजकीय टीका न करता एका साध्या आणि मिश्कील प्रतिक्रियेतून नागरिकांची अपेक्षा मांडली. वडापावच्या निमित्ताने सुरू झालेली ही चर्चा थेट ‘आईच्या हातच्या जेवणा’पर्यंत पोहोचली आणि त्यामुळे पुणे-नाशिक रेल्वेचा मुद्दा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला.
