जयश्रीताईबद्दल वसंतराव देशमुखांच वादग्रस्त विधान, राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले 

माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात युवा संकल्प मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांचे समर्थक वसंतराव देशमुख यांनी आपल्या भाषणात संगमनेरचे आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह वक्तव्ये केली. यावरून राज्यभर संताप व्यक्त केला जातोय.

जयश्री थोरात यांनी वसंतराव देशमुख यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन पुकारले आहे. वसंतराव देशमुख यांच्याविरोधात कारवाई होत नाही तोवर इथून हलणार नसल्याचा इशारा देण्यात आलाय. तर, दुसरीकडे सुजय विखे यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. या सर्व घडामोडींवर आता भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर त्यांनी पोस्ट केली आहे.

‘संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या युवा संकल्प सभेत वसंतराव देशमुख यांनी केलेले वक्तव्य म्हणजे राजकीय षडयंत्र असल्याचा संशय आहे. देशमुख यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. सभेला मिळणारा प्रतिसाद पाहून डाॅ.सुजय विखे यांच्यावरही हल्ला करण्याचा हल्लेखोरांचा प्रयत्न होता. संगमनेर तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी मी करत आहे’, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

Leave a Comment