ज्यांना गद्दार म्हटलं जातं, ते मुख्यमंत्री होतात, असं खळबळजनक विधान भाजपाचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे. माफी मागा, अन्यथा भाजपचं काम करणार नाही, अशी भूमिका एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं घेतली आहे. उल्हासनगरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे महायुतीमधील नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.ल्हासनगरात आयोजित भाजपा आणि साई पक्षाच्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी हे भाषण करत होते.
यावेळी उल्हासनगर महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीचा दाखला देत असतानाच अचानक त्यांनी “आता कुणीही गद्दार राहिलेलं नाही, ज्यांना गद्दार म्हटलं जातं ते मुख्यमंत्री होतात. राजकारणाची परिभाषा बदलली आहे. ज्यांना आम्ही काल गद्दार म्हणत होतो, ते आज आमच्या पक्षात सहभागी झाले आहेत, त्यांना आज आम्ही खुद्दार म्हणतो. काळाने हा बदल केला आहे”, असं प्रदीप रामचंदानी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये मोठी खळबळ माजली.
भाषण संपल्यानंतर रामचंदानी यांना याबाबत विचारलं असता, “मी तसं बोललोच नसून विरोधक ज्यांना गद्दार म्हणतात, ते मुख्यमंत्री बनतात. ते गद्दार नव्हे, तर खुद्दार असतात” असं मी म्हटल्याचा दावा रामचंदानी यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया आली आहे
