आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) हे त्यांच्या रोखठोक स्वभावामुळे ओळखले जातात. बच्चू कडू यांनी पुण्यात दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल मोठं वक्तव्य केलं. राज्यात सत्तांतर होऊन आता नऊ महिने होत आली आहेत. पण तरीही राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अद्याप पार पडलेला नाही.
मंत्रिमंडळ विस्तारावरुन बच्चू कडू यांनी याआधीदेखील अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदारांमध्येही याबाबत असलेली धुसफूस अनेकदा समोर आलेली आहे. असं असताना मंत्रिमंडळाचा विस्तार होताना दिसत नाही. याबाबत बच्चू कडू यांना विचारलं असता बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं.
बच्चू कडू हे महाविकास आघाडीच्या काळात राज्यमंत्री होते. पण सत्तांतरानंतर ते मंत्री होतील. त्यासाठीच ते गुवाहाटीला गेले होते, अशी दबक्या आवाजात चर्चा होती. या चर्चांनंतर स्वत: बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तार होत नाही म्हणून जाहीरपणे नाराजी देखील व्यक्त केलेली.
त्यामुळे बच्चू कडू यांनी शिंदे गट आणि भाजपला घरचा आहेर दिल्याची चर्चा होती. असं असताना बच्चू कडू यांनी आज मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “आमचे 20 मंत्री सक्षम आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची गरज नाही. लोकांची तक्रार नाही. 20 मंत्र्यांमध्ये सुद्धा मंत्रिमंडळ चालू शकतं. हे या सरकारने दाखवून दिलं”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली
