साकूरकरांना १५ वर्षांनंतर आलाय पुन्हा दैदिप्यमान योग, सप्ताहाची तयारी अंतिम टप्प्यात 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी)ब्रम्हलिन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज या फिरत्या अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य आयोजन संगमनेर तालुक्यातील साकूर येथील ग्रामस्थांनी केल आहे. ५ डिसेंबर रोजी या सप्ताहाला प्रारंभ होणार असून या सप्ताहाची सांगता १२ डिसेंबर रोजी होणार आहे. खास वैशिष्ट्य म्हणजे २००८ साली या सप्ताहाचा प्रारंभ झाला असून पहिला सप्ताह देखील साकूरलाच पार पडला होता. म्हणजे जवळपास १५ वर्षांनंतर साकूरकरांना या सोहळ्याचा पुन्हा दैदिप्यमान योग आला आहे. यंदाचे १६ वे वर्ष असून या सप्ताहाचा नारळ साकूर ग्रामस्थांनी घेतला असून या फिरता अखंड हरिनाम सप्ताहाची बिरेवाडीलगत शासकीय आश्रमशाळेशेजारील भव्य प्रांगणात जय्यत तयारी सुरू आहे. 

तसेच या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन मठाधिपती महंत ह.भ.प. दत्तागिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या नेतृत्वाखाली नियोजित कमिटी करीत आहेत. या अखंड हरिनाम सप्ताहासाठी साकूरसह पंचक्रोशीतील गावामधून मोठ्या प्रमाणात अन्नदान होणार आहे. या सप्ताहकाळात महाराष्ट्रातील नामांकित किर्तनकार, प्रवचनकार उपस्थित राहून सेवेतून पुष्प गुंफणार आहे.

नामांकित किर्तनकार किर्तन कोण?

या सप्ताहात ह.भ.प डॉ. हरिदास महाराज पालवे, रामाणाचार्य ह.भ.प समाधान महाराज शर्मा, गुरूवर्य ह.भ.प उल्हास महाराज सुर्यवंशी, ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज पाटील (जळकेकर), धर्मभूषण ह.भ.प गजानन महाराज शास्त्री, गुरूवर्य ह.भ.प जयवंत महाराज बोधले, महामंडलेश्वर १००८ गुरूवर्य ह.भ.प काशिनाथ महाराज पाटील या नामांकित किर्तनकारांचे किर्तन होणार आहे. तसेच शेवटच्या दिवशी म्हणजेच १२ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत मठाधिपती महंत ह.भ.प दत्तगिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने या ऐतिहासिक सप्ताहाची सांगता होणार आहे.

पखवाज व तबला जुगलबंदी

विशेषत; ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पखवाज व तबला जुगलबंदीचा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जगविख्यात पखवाज वादक तालमणी सुखदजी मुंडे, जगविख्यात तबलावादक पांडुरंगजी पवार व लहरा साथ सुधिरजी टेकाळे यांची जुगलबंदी बघायला मिळणार आहे. या सप्ताहकाळात अनेक दानशूर, राजकीय पुढारी, आमदार, खासदार, नामदार हजेरी लावणार आहेत.

 सप्ताहात कशी असणार व्यवस्था….

जवळपास २० ते २५ एकरमध्ये हा महामेळा भरणार आहे. यामध्ये मुख्य मंडप, भजन मंडप, भोजन व्यवस्था, निवास व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, २०० ते ३०० स्वयंसेवकांची व्यवस्था, गायक वादकांसाठी स्वतंत्र व्यवस्था, फिरते शौचालय, वैद्यकीय व्यवस्था अशी खास व्यवस्था सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आलीय.

विद्युत रोषणाई ठरणार आकर्षण

विशेषतः बिरोबारायांच्या पावनभुमीत दुसऱ्यांदा हा सप्ताह होणार असून संपूर्ण बिरोबा मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली. तसेच साकूर चौफुली पासून ते बिरेवाडीतील मुक्ताई मंदिरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खास विद्युत रोषणाई करण्यात आली. त्यामुळे एक खास आकर्षण रात्रीच्या वेळी बघायला मिळणार आहे. या सप्ताहाचा साकूर पठारभाग, जिल्हा, तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment