छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या संपर्कात….

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ आमदार छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुचक विधान करताना भुजबळ अधूनमधून माझ्या संपर्कात असतात, असे सांगून गुगली टाकली आहे. ते (Uddhav Thackeray) आज (दि.१७) नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. 

ते (Uddhav Thackeray) पुढे म्हणाले की, महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फिरता चषक पहिल्यांदा पाहतोय. विस्तारापेक्षा मंत्रिमंडळातील वजाबाकीची अधिक चर्चा होऊ लागली आहे. अडीच अडीच वर्षे मंत्रिपदे देणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणीपेक्षा लाडक्या आमदारांची जास्त चर्चा सुरू झाली आहे. आधी घटनाबाह्य सरकार पाहिले आता ईव्हीएम सरकार बघतोय, असा टोला त्यांनी सरकारवर लगावला.

विधानसभा निवडणुकीच्या निकालाविरोधात काही गावामध्ये विरोध सुरू झाला आहे. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही विजयाचा आनंद कुठे दिसून आला नाही. राज्यातील लाडक्या बहिणींना निकष न बघता पैसे द्यावे, असे मागणी ठाकरे यांनी यावेळी केली. दिवंगत पंतप्रधान पंडित नेहरूंचे रडगाणे आता भाजपने बंद करावे. तर काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलणे बंद करावे. त्याऐवजी आता आपण काय करणार आहोत. यावर भाजप आणि काँग्रेसने बोलावे, असे ठाकरे म्हणाले.

Leave a Comment