अहिल्यानगर :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्या अतिशय महत्वाच्या खात्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली, याबद्दल मी समाधानी असून, स्व.लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खो-यात आणण्याचे स्वप्न या निमित्ताने पुर्ण करण्याची संधी मिळाली असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
मंत्रीपदाची शपथ आणि जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर ना.विखे पाटील यांचे अहिल्यानगर येथे प्रथमच आगमन झाले.
विधानसभेत विरोधी पक्षनेता नाही, यावर माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, विरोधी पक्षाचा अवतार निवडणूकीतच संपला होता. निवडणूकीच्या दरम्यानच महाविकास आघाडीत बिघाडी सुरु झाली होती. त्यांचे अस्तित्व आता राहीलेले नाही अशी टिका करुन, त्यांनी सांगितले की, मराठा आरक्षणाच्या संदर्भात जरांगे पाटील यांनी नव्या सरकारला थोडा वेळ दिला पाहीजे. यापुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला दिलेले आरक्षण कायदेशिरदृष्ट्या टिकले होते. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आमचे सरकारही सकारात्मकच आहे. मात्र मध्यंतरी महाविकास आघाडी सत्तेवर आल्यामुळे मराठा समाजाला मिळालेले आरक्षण गमवावे लागले. आरक्षणाच्या बाबतीत महाविकास आघाडी गंभिर नव्हते याचे पाप त्यांच्या डोक्यावर आहे.
राज्यात महायुतीचे सरकार होते त्यावेळी आरक्षणाच्या बाबतीत आवश्यक तेवढे सर्व निर्णय घेण्यात आले होते. मागासवर्ग आयोगाची निर्मिती केली. राज्यात ५८ मोर्चे आणि अनेकांचे बलिदान झाले. पण ही सर्व परिस्थिती संयमाने हाताळण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी केली होती. आताही त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नव्याने सरकार स्थापन झाले आहे. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, चर्चेतुन हा प्रश्न सोडविता येईल. जरांगे पाटलांनी नव्या सरकारला थोडा वेळ दिला पाहीजे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले आहे
