महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा मोठं संकट

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले आहे. राज्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हिवाळ्यात राज्यात होत असलेल्या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान होणार आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या भागांत 30-40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे. तसेच या भागांत पावसाचा इशाराही पुणे येथील ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिला आहे.

का होतोय पाऊस?

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बदलांमुळे राज्यात पाऊस होत आहे. दक्षिण केरळ लगतच्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर होत आहे.

यामुळे राज्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी पाऊस अन् गारपीट होत आहे. राज्यातील जवळपास १२ ते १३ जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणार आहे. तसेच अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Leave a Comment