Walmik Karad: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडची (Walmik Karad) आजपासून सीआयडीने चौकशी सुरु केली आहे.सीआयडी कोठडी मिळाल्यानंतर वाल्मिक कराडच्या चौकशीचा आज पहिला दिवस आहे. एका बंद खोलीत वाल्मिक कराडची चौकशी केली जात आहे.
वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली. मंगळवारी (31 डिसेंबर) रात्री उशीरानं झालेल्या सुनावणीत वाल्मिक कराडला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आजपासून सीआयडीने वाल्मिक कराडची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. वाल्मिक कराडला (Walmik Karad) मंगळवारी रात्री 9.30 वाजता केज येथे आणण्यात आले.
रात्री उशिरा येथील न्यायालयासमोर त्यास हजर केले. यावेळी न्यायालयाच्या प्रक्रियेचा भाग म्हणून न्यायाधीशांनी वाल्मिक कराडला एक प्रश्न विचारला. पोलीस विरोधात तक्रार आहे का?, असा प्रश्न वाल्मिक कराडला विचारला. यावर वाल्मिक कराडने लगेच नाही असं उत्तर दिलं.
