नवी दिल्लीः गुरुवारी राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानावर भाजपच्या रेखा गुप्ता यांचा मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थित होती.
तसेच देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, देशातील काही राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भाजपचे वरिष्ठ नेते आदी मान्यवरांची विशेष उपस्थित या शपथविधी सोहळ्याला लाभली होती. तब्बल २७ वर्षांनंतर राजधानी दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री झाला आहे.
शपथविधी सोहळ्याला रामलीला मैदानावर मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात भारत माता की जय, जय श्री राम, मोदींचा जयजयकार अशा घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री पदी विराजमान झालेल्या रेखा गुप्ता यांनी शपथविधी सोहळ्याला परिधान केलेली साडी आणि जॅकेट याची मोठी चर्चा झाली. भाजपने मुख्यमंत्री रेखा गुप्ता, उपमुख्यमंत्री म्हणून प्रवेश वर्मा यांना संधी दिली आहे. तर इतर मंत्र्यांनाही संधी देत जातीय समीकरणे साधण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे.
पुढील पाच वर्ष दिल्लीचे सरकार हे स्थिर रहावे, हा यामगील भाजपचा हेतू असल्याचे सांगण्यात येत आहे. सात मंत्र्यांत प्रत्येकी दोन ब्राह्मण व पूर्वांचली, गुप्तांच्या रूपाने एक वैश्य (बनिया), एक शीख जाट व एक दलित चेहरा भाजपने दिला आहे. प्रवेश वर्मा यांनी शपथ घेताना आडनावाऐवजी आपले वडील माजी मुख्यमंत्री साहिबसिंह यांचा उल्लेख करून आपली नाराजी जाहीर दाखवण्याचे धाडस केले.
या शपथग्रहण समारंभात व्यासपीठावर असलेल्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण, यांच्यासोबत पंतप्रधान मोदींनी विशेष संवाद साधला. भगवी वस्त्रे परिधान करून आलेले पवन कल्याण सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी ‘तुम्ही हिमालयात जाण्याची तयारी करत आहात का?’ असा प्रश्न मोदींना कल्याण प्रश्न विचारला. या प्रश्नावर कल्याण यांनी त्यासाठी अजून वेळ असल्याचे उत्तर दिले.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही मोदींनी संवाद साधला. पण काय एकनाथजी सगळं ठीक ना? हे एक वाक्य सर्व काही बोलून गेले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या डाव्या तर उजव्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार होते. अजित पवार यांच्या डोळ्यांवर असलेला काळ्या रंगाचा गॉगल सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
