संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथून एक दुर्दैवी बातमी समोर आलीय. साकूर येथील दिपक रामचंद्र फिरोदिया यांचा अंदाजे दीड एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना बुधवारी घडलीय. महावितरण कंपनीच्या मुख्य लाईनवरील विद्युत तारा तुटल्याने अचानक आग लागल्याची माहिती समोर आलीय.
मिळालेली माहिती अशी की, साकूर येथील शेतकरी दीपक रामचंद्र फिरोदिया यांनी साकूर – जांबुत रोडलगत दीड एकर क्षेत्रामध्ये उसाची लागवड केली आहे. तसेच ऊस काही दिवसातच गळीतासाठी जाणार होता. या ऊसाच्या शेतातून महावितरण कंपनीची मुख्य विद्युत वाहिनी गेली आहे. दरम्यान याच मुख्य विद्युत वाहिनीची तार तुटल्याने या ऊसाला आग लागली. या आगीमध्ये शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. दरम्यान ऊस जळून खाक झाल्यामुळे शेतकरी वर्गात महावितरण कंपनीबाबत संताप निर्माण झाला आहे.
