बिग ब्रेकिंग! अखेर धनंजय मुंडेंनी दिला राजीनामा…..

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात संतापाची लाट उसळली आहे.

त्यातच या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

फडणवीसांचे धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले धक्कादायक फोटो समोर आल्यावर काल रात्री उशिरा राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचे माहिती समोर येत आहे. त्यानुसार आज धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला आहे.

वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा निकटचा सहकारी

संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांना निकटचा सहकारी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीतील प्रचाराची आणि त्यांच्या अनुपस्थितीत जिल्ह्यातील कारभाराची सूत्रे हाताळत होता. संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडचे नाव आल्यापासून धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी होत होती. मात्र, धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात थेट सहभाग नाही, असे सांगत अजित पवार यांनी त्यांची पाठराखण केली होती.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय त्यांचा पक्ष घेईल, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची केवळ चर्चाच सुरु होती. मात्र, सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्या करतानचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण संतप्त झाले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे भाग पडल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Comment