भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे(Vinod Tawde) यांना मातृशोक झाला आहे. तावडेंच्या मातोश्री विजया श्रीधर तावडे यांचं प्रदीर्घ आजारानं सोमवारी (दि.१०) निधन झालं आहे.त्यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
विजया तावडे यांच्यावर उद्या (दि.११) सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अमृत एन्क्लेव्ह विलेपार्ले पूर्व येथील निवासस्थानाहून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पश्चात विनोद यांच्यासह उद्योजक पुत्र विलास तावडे आणि मोठा आप्त परिवार आहे.
राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटविणारे व महाराष्ट्र भाजपमधील बडे नेते विनोद तावडे यांचे वडील श्रीधर तावडे नोकरीनिमित्त मुंबईत आल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील अनेक वर्षे लालबाग येथील तेजुकाया मॅन्शनच्या छोट्या खोलीत गेले. अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांना उत्तम शिक्षण दिले. वडिलांच्या प्रेरणेतूनच विनोद तावडे यांनी राजकारणात प्रवेश केला होता.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या विनोद तावडे यांनी निवडणुकांच्या काळात विविध राज्यांचे प्रभारी म्हणूनही काम केले आहे.
अलिकडेच त्यांच्यावर २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठीची रणनीती निश्चित करण्याच्यादृष्टीने गठित करण्यात आलेल्या समितीच्या प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली होती. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्यानंतर अशा प्रकारे जबाबदारी सोपविण्यात आलेले तावडे हे दुसरे नेते ठरले आहेत.
