संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर माळवाडी परीसरात मोटर सायकलचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या साईट कठडाला धडक बसल्याने भिषण अपघात झाल्याने या अपघातात दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवार दिनांक १० एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास माळवाडी परिसरातील हरियाणा हॉटेल जवळ पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे.
तालुक्यातील पठार भागातील तळपेवाडी येथे वास्तव्यास असलेले सुरेश दत्तात्रय जोशी (वय २४ ) व समीर बाळू तळपे ( वय २७ ) हे दोघे सोमवार दि १० एप्रिल रोजी कामानिमित्त आळेफाटा येथे गेले होते.सायंकाळी आपले काम आटपून त्यांची मोटर सायकल क्रमांक एम एच ०५ ए के ४२६५ वरून पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून आळेफाटा ते तळपेवाडी दरम्यान सायंकाळी घराकडे परतीचा प्रवास करत होते.
सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान महामार्गावरून प्रवास करत असताना माळवाडी परिसरातील हरियाणा हॉटेल जवळ आले असता त्यांचा मोटर सायकलवरील ताबा सुटल्याने गाडी महामार्गावरील साईट गटाराच्या पुलाच्या कठडावर जाऊन आदळली.यात अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना स्थानिक नागरिक , महामार्ग पोलिस,तसेच घारगाव पोलीसांच्या मदतीने खाजगी रुग्णवाहिकेतून आळेफाटा येथील माऊली ॲक्सिडेंट अँड मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.
परंतु या भयाण अपघातात सुरेश दत्तात्रय जोशी यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर समीर बाळू तळपे यांचा उपचारा दरम्यान रात्री उशिरा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेने तळपेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
सुरेश जोशी हा तळपेवाडी येथील मामा कडे वास्तव्यास होता. तर समीर तळपे हा त्याचा जिवलग मित्र होता.या दोघांची जिवलग मैत्री होती. परंतु काळाच्या ओघात दोघांचा आपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने पठार भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.
