राज्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला पुढचा 15 दिवसात मोफत वाळू मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती राज्याचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांनी दिली आहे. या योजनेनुसार घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू मिळणार आहे.
पुढील 15 दिवस पाच ब्रास वाळू मोफत मिळणार
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नागपूर विभागातील घरकुलांसाठी नि:शुल्क वाळू उपलब्ध करून द्या, असा आदेश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि तहसिलदारांना दिले होते. यात नागपूर विभागातील घरकुल योजनेच्या 5 ब्रासपर्यंत निःशुल्क वाळू उपलब्ध देण्याच्या सूचना केल्या होत्या. यामुळे घरकूलाच्या लाभार्थ्यांना सरकारचा मोठा दिलासा मिळालाय.
यावेळी तहसीलदारांना जवळचा वाळूगट नमूद करून पात्र घरकुल लाभार्थ्यांना अर्जाविनाही ऑनलाईन पास उपलब्ध करून द्यावे, असेही सांगण्यात आलं होतं. अशातच आता राज्यातील सर्व घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना पुढील 15 दिवस पाच ब्रास वाळू मोफत मिळणार असल्याचा निर्णय राज्याचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी घेतला असल्याचे स्वत: त्यांनी सांगितले आहे.
