संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील हिवरगाव पठार येथून एक खळबळजनक बातमी समोर आलीय. ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य रामदास भिमाजी गोंदके यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. लोकनियुक्त सरपंच कु. सुप्रिया मिसाळ यांच्याकडे हा राजीनामा रामदास गोंदके यांनी सुपुर्द केला आहे. गोंदके हे कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते.
कार्यकाळ पुर्ण होण्यास अवघे सात महिने बाकी असतानाच रामदास गोंदके यांनी राजीनामा दिल्याने कॉंग्रेस पक्षालाच धक्का बसला आहे. तसेच राजीनाम्याची एक प्रत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनाही पाठविली आहे. रामदास गोंदके यांना राजीनामा देण्यापुर्वी कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांनी यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न देखील केला होता मात्र कुठलाही तोडगा निघाला नाही. मात्र राजीनामा पत्रातून त्यांनी काही गौप्यस्फोट केला आहे.
नेमकं राजीनाम्यात काय म्हटल, वाचा जसाच्या तसा….
राजीनामा अर्ज
दिनांक – 28/05/2025
मा.कु. सुप्रिया प्रकाश मिसाळ (सरपंच हिवरगाव पठार)
विषय – हिवरगाव पठार ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा देण्याबाबत.
अर्जदार – श्री. रामदास भिमाजी गोंदके मु. पो. हिवरगाव पठार (गिरेवाडी)
विनंती अर्ज करतो की, मी हिवरगाव पठार (गिरेवाडी) येथील काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम पाहिले आहे माझी दूसरी पिढी काँग्रेस पक्षाचे काम करत आहे. आमच्या गिरेवाडी मध्ये शंभर टक्के आदिवासी ठाकर समाज आहे. माझ्या गिरेवाडीच्या विकासासाठी मला जनतेने ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून दिले आहे.
माझ्या वाडीमध्ये विकासाबाबत अनेक समस्या होत्या याबाबत मी काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्या मार्फत श्री. बाळासाहेब थोरात साहेब यांच्या बरोबर फोनवर दोन मिनिट बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती. या गोष्टीला साधारण चार ते पाच महिने होऊन गेले आहेत. याबाबत वरिष्ठांना साहेबांचे पीए श्री. भास्कर खेमनर यांना याबाबत कल्पना दिली होती. परंतु अद्याप पर्यंत वरिष्ठांचे कोणतेही बोलणे माझ्या बरोबर झाले नाही.
मी एक आदिवासी समाजाचा कार्यकर्ता असून सुद्धा आदिवासी बांधवांसाठी वरिष्ठांना बोलण्यासाठी वेळ मिळत नसेल तर हे खूप दुर्दैव आहे म्हणून मी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांवर नाराज होऊन मला कुठल्याही पदाची अपेक्षा नसून मी माझ्या ग्रामपंचायत सदस्यत्वाचा स्व-खुशीने राजनामा देत आहे तो आपण स्वीकारावा ही विनंती.
कळावे
रामदास भिमाजी गोंदके
प्रत माहितीसाठी – श्री. बाळासाहेब थोरात साहेब (मा.महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य)
