बिग ब्रेकिंग! पारनेरच्या पाणी प्रश्नावर आवाज उठविणाऱ्या भूमिपुत्रांच्या मागणीला मोठ यश

पारनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील कान्हूर पठार, पुणेवाडी, जातेगाव, राळेगणसिद्धी या उपसा सिंचन योजनेला मान्यता देऊन कार्यान्वित करण्यात यावे व डिंबे – माणिकडोह बोगद्याचे काम तातडीने सुरू करावे अशा विविध मागण्यासंदर्भात भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर, राज्य संपर्क प्रमुख अशोक आंधळे, संघटक बाळशिराम पायमोडे यांनी गेल्या सहा महिन्यांपूर्वी पारनेर तहसील कार्यालयासमोर तब्बल आठ दिवस उपोषण केले होते.

त्यावेळी डिंभे धरण विभागासह इतर विभागाचे अधिकाऱ्यांनी वरीष्ठांची तातडीने चर्चा केली होती. तसेच डिंबे धरण विभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी १ चे एम के शिंदे यांनी लेखी दिलेल्या आश्वासनानंतर त्यावेळी उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले होते. त्यानंतर भूमिपुत्रांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता. तसेच भूमिपुत्रांनी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबई येथे जाऊन भेट घेत याविषयी मंत्रालयात बैठक घेतली होती. तसेच वरील मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले होते. त्यावेळी ना. विखे यांनी हा प्रश्न लवकरच मार्गी लावू असे आश्वासन दिले होते. मात्र हा लढा आणखी तीव्र करण्यासाठी भूमिपुत्रांच्या वतीने गाव तिथे कृती समिती अभियान राबविण्यात आले होते. शेवटी अखेर भूमिपुत्रांच्या मागणीला मोठं यश मिळाले आहे.

कारण जलसंपदा विभागाच्या वतीने या कामाची निविदा प्रसिद्ध केली आहे‌. निविदेत पारनेर तालुक्यातील प्रस्तावित कान्हूर पठार, पुणेवाडी, राळेगणसिद्धी, जातेगाव या चार उपसा सिंचनाचे सर्वेक्षण करण्यासाठी ८ लाख ३५ हजार रुपयांचा उल्लेख करण्यात आला आहे. पारनेर तालुक्यातील पाणी प्रश्नासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेने मोठा लढा उभा केला होता. या लढ्यात हजारो शेतकऱ्यांनी पाठिंबा नोंदविला होता. मात्र भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या लढ्याला आज यश मिळाले असून शासनस्तरावर दखल घेतली आहे.

 

प्रसिध्दी पत्रक

जलसंपदा विभाग, शासन निर्णय क्रमांक निविदा ०४१७/प्र.क्र.२४७/१७/मोप्र-१ दि.१८/१०/२०२३.

महाराष्ट्र शासन,

जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता डिंभे धरण विभाग, मंचर ता. आंबेगांव, जि.पुणे पिन कोड ४१०५०३

ई-मेल पत्ता:- eedimbhedam@gmail.com

दूरध्वनी क्र.-

ई- निविदा सूचना क्र. १ सन २०२५-२६

महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांच्या वतीने कार्यकारी अभियंता, डिंभे धरण विभाग, मंचर ता. आंबेगांव, जि.पुणे, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन हे सक्षम निवीदाकारांकडून खालील कामाकरीता निविदा मागवित आहेत. सविस्तर निविदा सूचना शासनाच्या https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर व विभागीय कार्यालयाच्या सूचना फलकावर उपलब्ध आहे. सदर निविदेसाठी गुणवत्ता व खर्चावर आधारीत निवड (Quality and Cost Based Selection – QCBS) पध्दत लागू आहे. निविदा स्विकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता, डिंभे धरण विभाग, मंचर ता. आंबेगांव, जि.पुणे यांनी राखून ठेवला आहे. सदर निवीदेमध्ये काही बदल होत असल्यास विभागीय कार्यालयाच्या सूचना फलकावर उपलब्ध करून देण्यात येईल.

खालील कामाच्या तपशिलवार निवीदा सुचनेची व कोऱ्या निवीदा संचाची प्रत मिळण्यासाठी लेखी अर्ज या कार्यालयाकडे दिनांक ०५/०६/२०२५ ते १२/०६/२०२५ या कालावधीत सादर करावा. सिलबंद निवीदा दिनांक १२/०६/२०२५ रोजी दुपारी २.०० वाजेपर्यत कार्यकारी अभियंता, डिंभे धरण विभाग, मंचर (निघोटवाडी कॉलनी), ता. आंबेगाव, जि.पुणे यांचे कार्यालयात सादर कराव्यात. अट असलेली निविदा स्विकारली जाणार नाही.

कामाचे नाव- पारनेर तालुक्यातील प्रस्तावित ४ उपसा सिंचन योजना कान्हूर पठार, पुणेवाडी, राळेगणसिध्दी, जातेगाव उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करणे व प्राथमिक अन्वेषण अहवाल तयार करणे.

१) जिल्हा – पुणे

२) निवीदेची किंमत रुपये ८.३५ लक्ष.

३) कोऱ्या निविदा संचाची किंमत रू.२३६०/-(जी.एस.टी.सह)

४) निविदा उपलब्ध कालावधी:- दिनांक ०५/०६/२०२५ ते १२/०६/२०२५

५) निविदा उघडणे :– दिनांक १६/०६/२०२५ रोजी शक्य असल्यास किंवा त्यापुढे

जा.क्र. डिंधवि/लेशा/निविदा/ १५७४/२०२५

कार्यकारी अभियंता, डिंभे धरण विभाग

मंचर ता. आंबेगांव दि. २९/०५/२०२५

(प्रशांत पां. कडूसकर) कार्यकारी अभियंता

डिंभे धरण विभाग मंचर

Leave a Comment