लेखी आश्वासनानंतर पाटीलभाऊ कुदनर यांचं उपोषण मागे

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील शिंदोडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचांनी १५ व्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या पाण्याच्या टाक्या स्वतःच्या फायद्यासाठी घरासमोर बांधल्या असून त्या त्वरीत बंद करून साळवे आणि नाईक वस्तीवर बांधण्यात याव्या या मागणीसाठी पाटीलभाऊ सटवा कुदनर यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर दि. २९ मे पासून आमरण उपोषण सुरू केले होते. यासंदर्भात ३० मे रोजी विशेष ग्रामसभा देखील बोलविण्यात आली होती. ग्रामसभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

तत्पूर्वी उपोषण स्थळी भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले, खांबेचे सरपंच रविंद्र दातीर, सरूनाथ उंबरकर यांनी देखील धाव घेतली होती. यावेळी गुलाबराजे भोसले यांनी आमदार अमोल खताळ यांच्याशी थेट उपोषणस्थळावरून उपोषणकर्ते पाटीलभाऊ कुदनर यांच्याशी फोनवर चर्चा करून दिली. त्यानंतर खामकर वस्ती, गायकवाड वस्ती व चौंढी वस्ती या ठिकाणी ८ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात येईल या लेखी आश्वासनानंतर उपोषणकर्ते पाटीलभाऊ कुदनर यांनी आमरण उपोषण मागे घेतले.

दरम्यान दीड दिवसांपासून पाण्याच्या टाक्यांच्या कामाबाबत पाटीलभाऊ कुदनर उपोषणाला बसले होते. सदर विषय गंभीर असल्याने उपोषणाच्या पहिल्या दिवशीच भाजप राज्य कार्यकारिणीचे सदस्य रउफ शेख व ॲड. अमित धुळगंड यांनी भेट दिली होती. यावेळी त्यांनी संपूर्ण माहिती जाणून घेत गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. तसेच सदर विषय ग्रामसभेत घेऊन मार्ग काढण्यात यावा असे गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर यांनी असे सांगितले होते. त्यानंतर शुक्रवारी विशेष ग्रामसभा बोलविण्यात आली होती.

ग्रामसभेत या विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच या उपोषणाची दखल आमदार अमोल खताळ यांनी देखील घेत सविस्तर माहिती जाणून घेतली होती. त्यानंतर भाजप तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले व रविंद्र दातीर यांनी उपोषणस्थळी धाव घेतली होती. यावेळी उपोषणकर्ते पाटीलभाऊ कुदनर यांची मनधरणी करत आमदार अमोल खताळ यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पाटीलभाऊ कुदनर यांनी आपले उपोषण दीड दिवसांनी मागे घेतले. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपोषणस्थळी उपस्थित होते

Leave a Comment