पारनेर पोलिसांवर राजकीय दबाव, सुभाष गोळेंचा विधानभवनासमोर आत्मदहन करण्याचा इशारा 

पारनेर – तालुक्यातील देसवडे येथील सुभाष सकाहरी गोळे व सुनिता सुभाष गोळे या पती पत्नीला ११ जणांनी शेतातील विद्युत पोल व शेतीच्या वादाच्या कारणावरून वाद घालत लोखंडी रॉड, हॉकी स्टीक व कुऱ्हाडीच्या दांडक्याने ११ जून २०२५ रोजी शेतातच बेदम मारहाण केली. त्यानंतर या सर्व आरोपींवर पारनेर पोलिस ठाण्यात १३ जून २०२५ रोजी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पारनेर पोलिसांनी अद्यापही आरोपींना अटक न केल्याने सुभाष गोळे यांनी ३ जुलै २०२५ पर्यंत जर घटनेतील आरोपींना तातडीने अटक करून कारवाई केली नाही तर ४ जुलै २०२५ रोजी आम्ही आमच्या कुटुंबांसह मुंबई येथील विधानभवनासमोर आत्मदहन करणार असल्याचे निवेदनच नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना दिल आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मी सुभाष सकाहरी गोळे व माझी पत्नी सुनिता गोळे देसवडे, ता. पारनेर, जि. अ.नगर येथील रहिवासी आहे. शेतातील विद्युत पोल व शेतीच्या वादाच्या कारणावरून जवळपास ११ जणांनी मिळून वाद घालत मला व माझ्या पत्नीला अक्षरशः लोखंडी रॉड, हॉकी स्टीक व कुऱ्हाडीच्या दांडक्याने ११ जून २०२५ रोजी आमच्या शेतातच बेदम मारहाण केली. त्यानंतर या सर्व आरोपींवर पारनेर पोलिस ठाण्यात १३ जून २०२५ रोजी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र या घटनेत माझ्या पत्नीला आरोपींनी एकट गाठत मारहाण केली आहे. यामध्ये माझी पत्नी गंभीर जखमी झाली असून तीचा हात मोडला आहे. मला देखील बेदम मारहाण केली आहे. तसेच माझ्या मुलीला देखील या आरोपींनी सोडले नाही. तीला ही मारहाण करत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्याचबरोबर तीन वर्षांच्या मुलाला विहिरीत फेकून जीवे मारण्याचा प्रयत्न या आरोपींनी केला.

विशेषतः आरोपींनी एवढ घडूनही पुन्हा २२ जून रोजी जीवे मारण्याची धमकी दिली. तशी तक्रार देखील पारनेर पोलिस स्टेशनला दिली आहे. मात्र पारनेर पोलिसांनी राजकीय दबावामुळे एकाही आरोपीला अटक केली नाही. उलट आरोपींना पाठिशी घालत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. आमचं संपूर्ण कुटुंब अक्षरशः भयभीत झाले असून आमच्या संपूर्ण कुटुंबाला आरोपींपासून धोका निर्माण झाला आहे. आम्ही वारंवार पारनेर पोलिस स्टेशनला जाऊन आरोपींना अटक का केली नाही? असे विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. कारण आरोपींना पोलिसच पाठिशी घालत आहे. सर्व आरोपी परिसरातच फिरत आहे, तरी देखील पोलिसांना आरोपी सापडत नाही ही गोष्ट विचार करणारी आहे.

या आरोपींनी एका महिलेला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. माझी पत्नी सुनिता या घटनेने खुप घाबरलेली आहे. तीला काहीच सुचत नाही. आरोपी मोकाट फिरत असल्याने तीला भिती वाटत आहे. पारनेर पोलिस या गोष्टींकडे साधं लक्ष देखील देत नाही. जवळपास पंधरा दिवस उलटून गेले तरी देखील आरोपींवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच आमच्या कुटुंबाच काही बरेवाईट झाल्यास यास पोलिस प्रशासनच जबाबदार राहणार आहे, कारण आम्ही वारंवार मागणी करूनही आमच्या मागणीकडे पारनेर पोलिस दुर्लक्ष करत आहे. तरी ३ जुलै २०२५ पर्यंत जर आरोपींना तातडीने अटक करून कारवाई केली नाही तर ४ जुलै २०२५ रोजी आम्ही आमच्या कुटुंबांसह मुंबई येथील विधानभवनासमोर आत्मदहन करणार आहे. यास सर्वस्वी जबाबदार पोलिस प्रशासन राहणार असल्याचे सुभाष गोळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Leave a Comment