मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपासोबत जाणार, या चर्चेने सोमवारी पुन्हा जोर धरला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सासवड (जि. पुणे) येथे आयोजित शेतकरी मेळाव्याला ते जाणार होते. मात्र, हा कार्यक्रम रद्द करून ते मुंबईतच थांबले.
दुपारनंतर अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदारांची बैठक बोलावल्याच्या चर्चेने जोर धरला. दिवसभर याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाही त्यांनी चुप्पी साधल्याने चर्चेला बळच मिळाले. याचदरम्यान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सध्या राज्यात सुरु असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
तसेच अजित पवारांमध्ये मुख्यमंत्रिपदाचे होण्याचे गुण आहेत. त्यामुळे अनेकांना वाटतं की अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद लवकर मिळावं. पण भाजपासोबत जाऊन त्यांना कोणी पद देईल किंवा आश्वासन देईल, असं मला वाटत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे
