उपसरपंच सुभाष डोंगरेंच्या ‘त्या’ कार्याची दखल, कोल्हापूरला होणार राष्ट्रीय सन्मान 

संगमनेर (DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील जांबुत येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष भिमाजी डोंगरे यांना सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय आदर्श उपसरपंच पुरस्कार जाहीर झाला आहे. कोल्हापूर येथील जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने राष्ट्रीय आदर्श उपसरपंच पुरस्कारासाठी सुभाष डोंगरे यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण नामांकित मान्यवरांच्या हस्ते वार – रविवार दि १३ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता इंजिनिअरींग असोसिएशन, सामाणी हॉल कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे.

उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील घडामोडींवर वॉच ठेवण्यासाठी गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. साईट गटारींची कामे करून घेतली. दळणवळणाच्या दृष्टीने सीमेंट काँक्रिटीकरण रस्ते, स्मशानभूमी सुशोभीकरण करणे, जिल्हा परिषद शाळेत सोलर बसविणे, प्राथमिक उप आरोग्य केंद्र चालू करणे, कचरा घंटा गाडी ग्रामपंचायतीसाठी, आरोग्य, डोळे, रक्तदान शिबीर आयोजन करणे असे विविध कामे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी करून घेतली. तसेच काही वेळा गावच्या विकासासाठी धडाडीचे निर्णय देखील घेतले.

तसेच सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुभाष डोंगरे यांनी पठार भागातील रस्त्यांविषयी आवाज उठवला. विजेच्या प्रश्नांसाठी महावितरण कार्यालयावर आंदोलन, उपोषण केले. त्याचबरोबर पिंपळगाव खांड धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये वंचित गावांचा समावेश करण्यात यावा यासाठी तब्बल आठ दिवस आमरण उपोषण करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यामुळे सुभाष डोंगरे यांची पारनेर व संगमनेर तालुक्यात एक वेगळीच ओळख निर्माण झाली. सामाजिक प्रश्नांवर भूमिका बजावत असल्याने याच कार्याची दखल कोल्हापूर येथील जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेने घेतली. सुभाष डोंगरे यांना राष्ट्रीय आदर्श उपसरपंच पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचं सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Comment