वडगाव सावताळच्या सरपंचांचे उपोषण चिघळणार, संतोष वाडेकर यांचा प्रशासनाला गंभीर इशारा 

पारनेर(DSNews24/किरण पुरी) देशाला स्वातंत्र्य मिळून पाऊणशे वर्ष होऊन गेले तरीही काही गावांमध्ये अद्यापही सुविधा मिळत नसल्याचे दुर्दैवी गोष्टी समोर येत आहे. याच सुविधा मिळविण्यासाठी जर आजही आमरण उपोषण करण्याची वेळ येत असेल तर यापेक्षा दुर्दैव काय? असे म्हणण्याची वेळ आलीय. गावात स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रलंबित असलेल्या वीजेसह रस्त्याच्या कामासाठी अक्षरशः गावच्या सरपंचावर आमरण उपोषण करण्याची वेळ आलीय. गेल्या पाच दिवसांपासून पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील सरपंच संजय रोकडे यांनी वडगाव सावताळ ते गाजदीपुर रस्त्याच्या कामासह वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी गावातच आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र या आमरण उपोषणाची साधी दखल देखील प्रशासनाने घेतली नाही. तसेच कुठला तोडगाही निघाला नाही. उपोषणकर्ते संजय रोकडे यांची प्रकृती देखील खालावली आहे.

दरम्यान उपोषणाच्या पाचव्या दिवशी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी भूमिपुत्रांसह थेट उपोषण स्थळ गाठत सरपंच संजय रोकडे यांना पाठिंबा दिला आहे. तसेच संतोष वाडेकर यांनी उपोषणस्थळावरूनच थेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना फोनद्वारे लवकरात लवकर उपोषणावर तोडगा काढावा अशी मागणी केलीय. मात्र यावेळी मागील चार दिवसांत आमरण उपोषणाची साधी दखल घेतली नसल्याने भूमिपुत्र शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

जर प्रशासनाने सरपंच संजय रोकडे यांच्या उपोषणाची दखल घेत लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर वेळेप्रसंगी थेट जिल्हा परिषद कार्यालयातच गुरे व मेंढ्यासह घुसून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संतोष वाडेकर यांनी प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे आता हे आंदोलन चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता प्रशासन आमरण उपोषणावर काय तोडगा काढतय याकडेच सर्वाचे लक्ष लागले आहे.

यावेळी राज्य संपर्कप्रमुख अशोक आंधळे, जिल्हा संघटक बाळशिराम पायमोडे, किरण वाबळे, अन्सार पटेल, राजू रोकडे, चेअरमन संजय भोर, संतोष गागरे, नंदू साळवे, नारायण रोकडे, दादाभाऊ रोकडे, संदीप व्यवहारे, दादा शिंदे, ऋषिकेश रोकडे, तुकाराम रोकडे, चेअरमन सर्जेरराव रोकडे, राजु भोसले, रामचंद्र रोकडे, बबन शिंदे, बाबासाहेब दाते, संदीप रोकडे, पोपट शिंदे, विठ्ठल जाधव, सामाजिक कार्यकर्ते दत्ता सरोदे, बाबासाहेब लोखंडचूर, सतीश तिखोळे, वामन रोकडे, यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment