अहिल्यानगर येथील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्यास सुरूवात झाली आहे. भाजप नेते तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना डिवचले आहे. थोरात यांच्यावर टीका करत त्यांनी, काही लोक राजकीय पराभवाच्या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत, असा चिमटा काढला आहे.
विखे पाटील यांनी थोरात यांच्यावर टीका करताना, काही लोक अद्याप राजकीय धक्क्याच्या सदम्यातून बाहेरच पडलेले नाहीत. त्यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. सध्या अशा पराभूत झालेल्या लोकांना काही आरक्षण देता येतं का? याचा विचार मी करतोय, असा खोचक टोला विखेंनी थोरातांना लगावला.
तसेच थोरातांना जोरदार टोला लगावताना, कधी काळी हे स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणून मिरवत होते, असाही निशाना विखेंनी साधला आहे. विखे पाटील म्हणाले, मला कधी कधी काँग्रेसच्या पुढाऱ्यांचं आश्चर्य वाटतं. स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणून हे मिरवत होते. पण झालं काय?
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून देखील विखेंनी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करताना त्यांना चांगलेच फटकारलं आहे. पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. मात्र ते कोर्टात तुम्ही घालवलं. हे तुमचं पाप काँग्रेसवाल्यांचे असल्याचे सांगत आरक्षणाबद्दल काँग्रेसवाल्यांना काहीही सोईर सुतक नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही असे तुमचे जाणते राजे म्हणायचे अशीही टीका विखे पाटलांनी केली आहे.
