जळगावात माध्यमांशी बोलताना संजय राऊत(Sanjay Raut) यांनी 15 दिवसांत सरकार कोसळणार असल्याचा दावा केला आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊतांच्या वक्तव्याची माहिती माझ्याकडे नाही त्यावर मी काय बोलू? असं अजित पवार यांनी म्हटलं.
सर्व सरकारच भ्रष्ट आहे. पुढील 15 दिवसांत हे सरकार कोसळणार आहे. सरकारचं डेथ वॉरंट तयार आहे. त्यावर सही व्हायची बाकी आहे. पुष्पचक्र अर्पण करा, असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर अजित पवार यांना विचारल्यावर अजित पवार म्हणाले, मला त्यावर काहीही बोलायचं नाही. त्यांची आणि माझी नागपूरमधून एकत्र येत असताना भेट झाली होती. त्यानंतर समक्ष आणि फोनवर कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही.
संजय राऊतांनी कोणत्या आधारे वक्तव्य केलं माहिती नाही. अनेकजण अशी वक्तव्य करतात. त्यामुळे संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याची माहिती माझ्याकडं नसल्याने त्यावर काय बोलू? असं अजित पवार यांनी सांगितलं.
