संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथे एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याचा प्रकार वार – रविवार दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आला आहे. मुळा नदी किनारी असलेल्या शिवमंदिरातील भक्तनिवासात ही घटना घडलीय. भाऊराव विठ्ठल बाचकर (वय ३५) रा. करकवाडी वावरथ जांभळी, ता. राहुरी जि. अहिल्यानगर असे मयताचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण पठार भागात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेली माहिती अशी की, मांडवे बुद्रुक येथे मुळा नदीकिनारी शिवप्रभात ट्रस्ट देवस्थान आहे. या देवस्थानाने एक भक्तनिवास उभारले आहे. दररोज सकाळी शिवमंदिरात देवदर्शनाला भाविक जात असतात. रविवारी सकाळी काही भाविक गेले असता त्यांना भक्तनिवासातील सभामंडपात भाऊराव बाचकर हे रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले.
या घटनेची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच संगमनेरचे पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, घारगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, उपनिरीक्षक आदिनाथ गांधले यांच्यासह पोलिस नाईक दत्तू चौधरी, पो.कॉ. महादेव हांडे, चंद्रकांत मेढे, अमृता नेहरकर, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे, संतोष फड यांनी घटनास्थळी धाव घेतली. ठसा तज्ञांचे पथकही दाखल झाले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
मयत भाऊराव बाचकर यांच्या डोक्याखाली मोठ्या प्रमाणात रक्त दिसून आले. त्यांच्या शेजारीच एक दगड देखील पडलेला होता. तसेच काही बांगड्यांच्या काचा दिसून येत होत्या. पोलिसांनी घटनास्थळावर संशयास्पद आढळून आलेल्या सर्व वस्तू ताब्यात घेतल्या आहेत.
दरम्यान भाऊराव बाचकर हे शनिवारी सायंकाळी मांडवे बुद्रुक येथील लिंबफाटा येथे आले होते. त्यानंतर ते शिवमंदिराकडे गेले होते अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. परंतु बाचकर यांच्या मृत्युमागे काहीतरी मोठं कारण असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र भाऊराव बाचकर यांचा खून आहे की घातपात याची कसून चौकशी घारगाव पोलिस करत आहे. बाचकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. लवकर भाऊराव बाचकर यांच्या मृत्युमागच कारण पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहे.
