एकनाथ शिंदेंना हटवून अजित पवार राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार?

मुंबई – राज्यातील सत्ता संघर्षाच्या खटल्याचा निकाल येत्या काही दिवसांत येण्याची शक्‍यता आहे. या खटल्यात नेमकं काय होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मागील काही दिवसांत पडद्यामागून आणि पडद्यासमोर सुरू असलेल्या राजकीय चर्चांमुळे मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांमुळे भाजपचे दिल्लीतील नेते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात खरंच भूकंप होणार आहे का? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा बदलले जाणार आहेत का? शिंदेंना हटवून अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होणार का? याची चर्चा सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून पक्ष फोडीचा दुसरा सीझन सुरू होणार असल्याचे म्हणत भाजपच्या निशाण्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस असल्याचे म्हटले होते.

राऊत यांनी या सदरात अप्रत्यक्षपणे अजित पवार यांच्याकडे बोट दाखवले होते. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्याच्या राजकारणात दोन स्फोट होणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यातील शिवसेना-शिंदे गट आणि भाजपचे सरकार जाऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपचे सरकार येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. या सरकारमध्ये अजित पवार हे मुख्यमंत्री येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती.

त्यानंतर अजित पवार यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. पण एका माध्यम समूहाला दिलेल्या खुल्या मुलाखतीत मुख्यमंत्रीपदासाठी आपण आजही तयार असल्याचे वक्तव्य केल्याने पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत

Leave a Comment