संगमनेर – नगरपालिकेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र या निवडणुकीत एक चर्चेचा विषय समोर आलाय. काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करत अमोल खताळ व महायुतीने विधानसभेचे मैदान गाजवले. पण आमदार खताळ यांनी संगमनेरमध्ये नगरपरिषदेच्या निवडणुकीत आपल्याच कुटुंबातून उमेदवारी अर्ज भरत तेही घराणेशाहीचेच पुरस्कर्ते आहेत असा संदेश दिला आहे. त्यामुळे आमदार अमोल खताळ चांगलेच ट्रोल होऊ लागले आहेत.
कारण विधानसभा निवडणुक अमोल खताळ यांनी गाजवली होती. त्यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना पराभूत करत राज्याचे लक्ष वेधले. त्यावेळी त्यांनी अनेक सभांमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या घराणेशाहीचा मुद्दा मांडला. विधानसभेनंतर देखील ‘त्यांची ७२ वर्षाची घराणेशाही व आपले एक वर्ष’ अशी तुलना आमदार अमोल खताळ करत आहेत. पण, विधानसभेनंतरच्या नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत त्यांनी आपल्या भावजई सुवर्णा संदीप खताळ यांना शिंदे गटाकडून मैदानात उतरवले आहे. त्यांनी कार्यकर्त्याचा उमेदवारीसाठी विचार केला नाही.
त्यामुळे महायुतीत मोठी नाराजी पसरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आमदार अमोल खताळ यांनी विचार न करता आपल्याच कुटुंबातून नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिल्याने निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच संगमनेरात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या पत्नी रुपाली पवार व भाजपकडून सुजाता राजेंद्र देशमुख यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे महायुतीतच विसंवाद असल्याचे चित्र समोर आले आहे. तसेच संगमनेर सेवा समितीकडून थोरात यांच्या भाचेसून व आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे नगराध्यक्षपदासाठी मैदानात आहेत. पण, आता थोरात यांचेविरुद्ध घराणेशाहीची टीका कशी करायची? कारण, आमदार खताळही घराणेशाहीच्याच मार्गाने निघाले आहेत. त्यामुळे महायुतीची मोठी अडचण निर्माण होणार आहे.
तसेच संगमनेर नगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडीने ‘संगमनेर सेवा समिती’च्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीचे नेतृत्व स्वतः आमदार सत्यजित तांबे करत आहेत. नगराध्यक्षपदासाठी सुरुवातीपासूनच माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे किंवा डॉ. मैथिली तांबे यांचे नाव चर्चेत होते, अखेर डॉ. मैथिली तांबे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील संगमनेर सेवा समितीने नगराध्यक्षपदासह सर्वच्या सर्व 30 नगरसेवकपदाचे उमेदवार जाहीर केले आहेत, यामुळे त्यांनी निवडणुकीची तयारी पूर्ण केल्याचे चित्र आहे.
महायुतीकडून उमेदवारांच्या नावावर शेवटपर्यंत एकमत होताना दिसत नव्हते, त्यांचा अखेरपर्यंत गुंता कायम होता. महायुतीने केवळ नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले. मात्र नगरसेवकपदाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली नव्हती. दुसरीकडे, निवडणूक प्रक्रियेतून ऐनवेळी विखे – पाटील पिता-पुत्रांनी माघार घेतल्याने भाजपची मोठी कोंडी झाल्याचे दिसले. नावे निश्चित करण्यासाठी नेमलेल्या सुकाणू समितीचाही फारसा प्रभाव दिसला नाही. त्यामुळे नगरपालिकेची निवडणूक आमदार अमोल खताळ यांच्यासाठी जड जाणार असल्याची मोठी चर्चा संगमनेर रंगली आहे.
